लेखक

0
एखादे भौतिक सत्य किंवा काही रोचक कल्पनांतून एक प्रकारच्या सत्याचीच उकल करणारा अ'लेख' मांडणारा म्हणजे लेखक.
नाण्याच्या दोन्ही बाजू समजावून दोन्हींना योग्य न्याय मिळवून देणारा लेखक.
जिज्ञासू वृत्ती बाळगत चालू गोष्टींचा आढावा घेत मुठभरीतून तीळमात्र का होईना; पण काहीतरी शिकण्याची तयारी ठेवणारा लेखक.

समाजातील सत्यतेची उकल सर्वांसमोर आणण्याची हिंमत करणारा एक निर्भिड चरित्र म्हणजे लेखक.
एका कोर्या कागदाला रणभूमी/रंगभूमीची वागणूक देऊन लेखणीला शस्त्राची/कलेची उपमा देत शब्दांशीच खेळत, शब्दांशीच लढत रम्यक काहीतरी घडवणारा म्हणजे लेखक.
वाणीने मोकळा, जिव्हेने तडक-फडक, धारदार बुद्धीधारक पण मनाने मोकळा असणारी व्यक्ती म्हणजे लेखक.

अशा कितीतरी, असंख्यच व्याख्या आज लेखकाबाबतीत आहेत मात्र; माझ्या मते...
'साधी राहणी, उच्च विचार, करी शब्दांनी सत्यप्रचार' यापलीकडे एका लेखकाची फार मोठी परिभाषा करण्याची गरज नाही.
"निंदा स्तुती
कुणांची, वधु-वरां,जनांची" यापलीकडे सुद्धा गाठ-भेट, चर्चा, विचार, विनिमय होऊ शकतात हे एक लेखकच सिद्ध करु शकतो.


लेखक 'विचार-परिवर्तक' असतो.
(मी केवळ घटना विस्तार करतो.अर्थात एक 'विचार-प्रसारक' म्हणू शकता. सध्या तरी लेखक म्हणण्यास योग्य नाही.)
तसं पाहता लेखन काही अवघड आणि जगावेगळं नाही. पण जे काही लिहिल्या गेलं आहे, ज्यामुळे नवीन विचार घडले, नवीन चरित्र घडले, ज्यामुळे एकच; पण सकारात्मक बदल घडला आहे आणि ज्याच्या प्रभावाने एक वाटेवरुन भरकटलेलं जीवन पुन्हा वाटेवर आले आहे त्याला 'अस्सल' लेखन म्हणू शकतो.

पण चार चौघांनी दाद देऊन पुन्हा त्याकडे कटाक्ष सुद्धा टाकला नाही अशाला लेखन म्हणणे उचित नाही.
तसे तर विनोद पण असतात मग!
मग घोडं नेमकं अडतं कुठं?
तर आज वाढत्या पीढीला प्रेरणार्थक काही वाचायला उपहासात्मकच वाटते जणू!
काय सांगावं....एखाद्यावेळेस तर सत्य म्हणून सुद्धा लोकं वाचन टाळतात; ही एक गंमतच!
पण या मजेशीर समाजात जसे एखाद्या झाडाच्या फांदीचेच लाकूड तोडून, त्याची कुर्हाड बनवून त्याच्यावरच घाव घालणे तसेच शब्द लोकांचेच घेऊन त्यांच्याच शालजोडीत देऊन प्रबोधन आणणे सुद्धा अवघड नाही.
लोकं किर्तन लावतात. किर्तनकार येतात, किर्तन सांगतात आणि किर्तनात ज्याने किर्तन लावले त्याची पण थोडीशी खेचतात पण ते ज्याला-त्याला पटतं.
का....?

कारण किर्तनरकाराने आपली छवि अगोदर उच्च बनवून घेतली न कधी कुणाला कसला विरोध करता. आणि एकदा का या उच्चतेवर लोकांचा विश्वास बसला कि मग दोन गालात खाल्ल्या तरी "वाह महाराज!" हेच उद्गार निघतात.
अर्थात....जो स्वत: सिद्ध असतो तो मग पुढे कितीही उग्र लेखन करु द्या....अखेर तो प्रसिद्धी मिळवून बसलेला असतो, असा असावा लेखक.

लेखक सुद्धा कुणी इतर ग्रहावरुन आलेली व्यक्ती नसते. केवळ फरक असतो तो विचार करण्याच्या पद्धतीचा आणि विचार करण्याच्या शक्तीचा! येथूनच वैचारिक गुणवत्ता कशी आहे हे समजल्या जाऊ शकते.
चार शब्द वाचून, कुणाचं उष्टं-पाष्टं उचलून, इकडचं तिकडं अन् तिकडचं इकडं करुन जुळवाजुळवी करणारा लेखक नव्हे; तर एखादे काहीतरी सुकृत-विकृत, अभद्र-सुभद्र पाहून आधी त्याची प्रचिती घेऊन मग त्याबद्दलचा आढावा मांडणारा म्हणजे लेखक.

असा लेखक आज प्रत्येकात आहे. "वेळ नाही", " सोडून द्या", "होत असतं" या फुटक्या विचारांमुळे तो कुठेतरी दबून बसलेला आहे.
योग्य विचार क्षमता आणि अस्सल वैचारिक गुणवत्तेद्वारे मात्र त्याला जागृत करता येते.....
पण सत्याला झटण्याची आणि परिवर्तन आणण्याची इच्छा असेल तरच!


- अविनाश काठवटे

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)