अज्ञातात आनंद😇

1

आयुष्यात लहानपणापासूनच मनासाठी निर्माण झालेली एक भयानक आणि भयावह गोष्ट म्हणजे 'परीक्षा'!
अभ्यास काही करावा वाटतच नाही गडे! कारण शिक्षण म्हणजे केवळ औपचारिकतेचा पसारा बनला आहे. केवळ मानसिकरित्या सुदृढ बनवणे आणि बळजबरीच आपला बुद्ध्यांक वाढविण्याचा प्रयत्न करणे याचा जणू ठेकाच घेतला आहे शिक्षणाने!

आजचे शिक्षण म्हणजे बुद्धीच्या बाहेरचा खेळ आणि फक्त पोट भरण्यासाठीचा ताळमेळ बस इतकेच व्याख्यित बनले आहे; ज्यात ना शारीरिक विकासयोजनेचा अहवाल आहे, ना भौतिक विकासयोजनेचा आढावा!

केवळ घाशीराम कोतवालासारखं रात्रंदिवस घोक-घोक घोकंपट्टीचे धंदे!

एकाअर्थी मी तर (वैयक्तिक) म्हणतो, कि शिक्षणाला बाजारु रुप आले आहे. वह्या-पुस्तक, कपडे आणि इतर शालेय वस्तू शाळेतून मिळतात आणि शिक्षणासाठी मात्र शिकवण्या लावाव्या लागतात ते सुद्धा बाहेर!
वा रे वा!
हे असे शिक्षण काय आपली गुणवत्ता ठरवणार, ज्याचीच खिचडी होऊन बसली आहे निव्वळ!
म्हणून एक माझं मत सांगतो.....
निकाल हातात येईपर्यंत कुठलाही त्रास मनामध्ये असायला नको.

"कसा लागेल निकाल, काय होईल माझं, पास तर होईल ना" वगैरे वगैरे विचार बुद्धीबाह्य ठेवायचे.
आणि "काय लागेल ते लागेल निकाल; मी मला जेवढं समजतं तेवढं मनाने कोरुन आलेलो आहे" एवढीच जरी जाणीव ठेवली मनात तरी पुरे झालं.
कारण या शिक्षणात आपल्यातील अगणित, छुप्या कलांना वाव देण्याचे सामर्थ्य बिलकूल नाही. किंवा लायकी म्हटले तरी कमीच!
आणि आपल्याला काय पैसे लागत आहेत का सकारात्मक विचार करायला?

बेधडक राहायचं! कितीही गुण मिळो. कारण हे कागदावरचे गुण आपल्या आत्मिक गुणांसमोर शुन्यापेक्षाही क्षुल्लक आहेत.

एखाद्याचे जास्त गुण पाहतां खचून जाण्याऐवजी "अं....मी कमी गुण घेतले म्हणून याला जास्त पडले" असे मनाला बजावून सांगायचं. कारण जे इतरांत आहे ते आपल्यात नसले तरी जे आपल्यात आहे ते इतरांत नाही हे तितकेच खरे!

मुळात आयुष्य जगण्यापेक्षा सर्वात मोठी परीक्षाच नाही कुठली आणि आपण हीच परीक्षा जर हसत-खेळत सर करु तर वर्षाला भय दाखवणार्या परीक्षा काय वाकडं करु शकणार आहेत आपलं?

जीवन आपलं आहे, कर्म आपले आहेत, भोगायचे सुद्धा आपल्यालाच आहे मग इतरांच्या शिल्लक आणि व्यर्थ गप्पांना न्याय न देता "उद्या काय होणार" याऐवजी "आज मी आहे आणि बरा आहे. पुढचं पुढे बघता येईल. आज जरा जगून घेतो" बस इतकंच उराशी पाळायचं आणि वाटचाल मेहनतीने व सदाचाराने करायची...

आनंदच आनंद आहे!😇

- अविनाश काठवटे




Tags

Post a Comment

1Comments
  1. नक्कीच दादा...आयुष्य जगण्यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी परीक्षा नसू शकते...आणि जो ही परीक्षा पास होतो तोच पुढे जातो...खूप छान वाटल दादा लेख वाचून...👌👌👌

    ReplyDelete
Post a Comment