चूकांचा शेजार असावा!😊

0

माणूस...या सृष्टीतील सर्वांत बुद्धिमान प्राणी!

संशोधक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि नूतनीकरणासाठी सतत प्रयत्नत असलेले पात्र म्हणजे माणूस!

पण संशोधन करतांना प्रत्येक वेळी यशच गवसणे गरजेचे नाही.

कधी कधी अपयश सुद्धा बरेच धडे देऊन जाते.

माणूस चूकतोच आणि माणूसच चूकतो!

कारण चूकतो तोच जो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि माणसाशिवाय नव्या कल्पनांशी मैत्री करणारं इतर दूसरं चरित्र तर नाहीच या जगी!

थॉमस अल्वा एडिसन नावाच्या वैज्ञानिकामुळे आज विश्वात प्रत्येक घरामध्ये उजेड आहे. हा तोच माणूस आहे ज्याने तब्बल नऊशे नव्व्याण्णव वेळेस प्रयत्न करुन, त्यांत अपयशी होऊन हजारव्या वेळी आपली योग्यता स्पष्ट करत विजेच्या बल्बाचा शोध लावला.

जगाच्या दृष्टीत एडिसन नऊशे नव्व्याण्णव वेळेस चूकला; पण सकारात्मक दृष्टीने विचार केला तर नऊशे नव्व्याण्णव वेळेस तो नवीन काहीतरी शिकत गेला.

चूकांतून शिकण्यासारखे बरेच काही असते पण आपण शिकण्यातच चूका करतो म्हणून गोंधळ होतो!

सकारात्मकतेचा प्रभाव यावर कसा दिसून येतो ते जगद्गुरु तुकोबांच्या जीवनप्रणालीद्वारे समजून घेता येते.

एकदा तुकोबाराय शेतातून ऊसाची मोळी घेऊन घरी परतत होते.

वाटेत काही पोरं खेळत होती. त्या पोरांची नजर थेट तुकोबांच्या पाठीवर असलेल्या ऊसाच्या मोळीवर पडली.

त्या आगाऊ पोरांनी हळूहळू एक-एक करत तुकोबांच्या पाठीवरील सर्व ऊस गुपचूप चोरले आणि मोळीत एकच ऊस ठेवला.

यादरम्यान तुकोबांना सर्व काही जाणवत होते पण त्यांनी कसलाही विरोध केला नाही.

शेवटी संत होते ते!

घरी आल्यावर जेव्हा त्यांच्या पत्नीने पाठीवर एकच ऊस पाहिला तेव्हा तोच ऊस घेऊन त्यांनी रागाच्या भरात तुकोबांच्या पाठीवर मारला.

ऊस पाठीवर लागताच त्याचे दोन तुकडे झाले.

यावर तुकोबाराय म्हणाले, "आवले, किती काळजी आहे गं तुला माझी? चल एक तुकडा तू घे अन् एक तुकडा मी घेतो!"

उगाच कुणी 'जगद्गुरु' बनत नाही!

खरं तर चूकांना दोष देण्याऐवजी गुरुसम दर्जा द्यायला हवा. कारण चूकांपेक्षा योग्यता काय ते शिकवणारे ज्येष्ठ तत्व कुठलेच नाही.

तसं पाहतां चूकांमुळेच योग्यतेला महत्व आहे!

तसेच एखाद्या विशिष्ठ क्षेत्रामध्ये काराकीर्द नोंदविण्याकरिता त्या क्षेत्रात प्राविण्य आणि पूर्ण ज्ञान प्राप्त केलेल्याला नाही तर त्यात पराभूत झालेल्यांचा आदर्श घ्यायला हवा.

कारण विजेता केवळ 'जिंकायचं कसं' याबाबतीतच सांगू शकतो पण पराभूत पराजयाचं नेमकं कारण काय आणि ते होऊ नये यासाठी काय करायला हवे हे चांगल्यापैकी समजावू शकतो.

अर्थात चूकांना डावलण्याऐवजी त्या स्वखुशीने स्वीकारायला हव्यात. चूकांचे खापर कुण्यां इतर घटकांवर फोडण्याऐवजी त्यांपासून सावध होऊन नवीनतम नियोजन कसे करता येईल याचा विचार करायला हवा.

माणूस चालावा योग्यतेच्याच मार्गाने; पण त्याच्या योग्यतेला चूकांचा शेजार नक्कीच असावा.

हारण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी!


- अविनाश काठवटे😇




Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)