स्वयमेव मृगेंद्रता

0

   तेज आणि तारुण्य हे असे दोन पैलू आहेत; जे एकमेकांशिवाय अगदी असाहाय्य आहेत. म्हणजे तारुण्य तर आहे पण तेजच नाही तर ते तारुण्य व्यर्थ आहे; शिवाय तेज आहे मात्र तारुण्यशक्तीचाच अभाव असेल तर ते तेज सुद्धा निरर्थक आहे.

तेजस्विता म्हणजे नेमकं काय?

जो तरुण स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा असेल, जो स्वत:च्या कर्मवृत्तीचा पुजारी असेल, जो षड्विकारांपासून मुक्त असेल आणि ज्यामध्ये संगठनात्मक भाव असेल तो खरा तेजस्वी तरुण!

किलोभर रासायनिक पांढरी भुकटी चेहर्याला फासून गौरवर्णीय कांतीचा देखावा तर सहज आपण मिरवू शकतो पण आंतरिक सौंदर्य फुलवायचे असेल तर हे तेज असणे महत्वाचे!

महत्वाचं म्हणजे हजरबाबीपणाची समज असायला हवी.

मी कुठल्या वेळी कुठली कृती करायला हवी हे लक्षात यायला हवं.

इ.स. १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना तर केली पण तर्कवितर्कांच्या घोड्यांनी या कार्याला निरनिराळ्या दृष्टीने हाताळण्यास सुरुवात केली.

संघविस्तारासाठी जेव्हा डॉ.हेडगेवार एका जणाकडे गेले, तर त्या माणसाने डॉक्टरांनाच उलट प्रश्न विचारला कि, "समजा; मी संघाच्या शाखेत येत आहे. घरातून मी ठराविक वेळेवर निघालेलो आहे आणि संघस्थानावर मला नियोजित वेळेत पोहोचायचे आहे; पण वाटेत एका घराला भीषण आग लागली आहे. तर मी त्यावेळी तिथे मदतस्वरुप कार्य करणे उचित राहील कि शाखेकडे पाऊल उचलणे योग्य राहील?

डॉक्टर हसले आणि म्हणाले, "हीच समज आणि हाच हजरबाबीपणा तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्ही आधी शाखेचत येणे उचित राहील. म्हणजे पुन्हा असा प्रश्न तुमची शिरखाज वाढवणार नाही."

नेमकं आजच्या विश्वात मुख्यत: युवा पीढी याच वळणावर भरकटते कि आपण कुठल्या कामासाठी उभे आहोत आणि आपण करतो काय आहोत!

ही पीडा जेव्हा दूर होईल तेव्हा प्रत्येक युवा कर्मकुशलतेच्या आहारी नक्कीच जाईल.


"नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते वने|
विक्रमार्जितस्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता||"

अर्थात; सिंहाला जंगलाचा राजा बनण्याकरिता कसल्या अभिषेकाची किंवा संस्कारांची गरज पडत नाही. तो आपल्या कार्यशक्तीने आणि साहसी वृत्तीमुळेच राजा म्हणून कार्यन्वित होतो.

अशी साहसी वृत्ती आणि कार्यशक्ती जर आजच्या तरुणामध्ये असेल तर तेजस्वी स्वरुप निर्माण होण्यास विलंब लागणार नाही. शिवाय या पराशक्तीचा विजय कधीही निश्चितच!


- अविनाश काठवटे







Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)