आत्मपॅम्फ्लेट: आत्मकथेचे 'राडे'!

0


 आत्मपॅम्फ्लेट: आत्मकथेचे 'राडे'!

     दि. १३ ऑक्टोबर; निमित्त होतं चित्रपट दिनाचं. ९९/- मध्ये चित्रपट पाहायला मिळणार असल्याचा उत्साह आणि त्यातल्या त्यात मराठी चित्रपट पाहण्याचा उठलेला गजकर्ण!

     आणि चित्रपट ठरला; आत्मपॅम्फ्लेट. परेश मोकाशींचा चित्रपट म्हटल्यावर अपेक्षांना आलेलं उधाण आणि त्याच अतिपल्लवित अपेक्षांसह चित्रपटगृहात प्रवेश केला. सुरुवातीपासूनच एकीकडे दृश्य स्वरूपात घटनेचा क्रम आणि दुसरीकडे चालू घटनेचं समालोचन सुरू होतं. मुख्य पात्राच्या जन्मापासून सुरू झालेला चित्रपटाचा प्रवास; देशाच्या सर्वांगीण उचित-अनुचित घटनाक्रमाशी कशा पद्धतीने समांतर आहे, ही दाखविण्याची कल्पकता पाहतांना इतर चित्रपटांपेक्षा वेगळी आणि काहीशी चांगली वाटली.

     लहानपणीच्या प्रेयसीने दचकून मुख्य पात्राचा धरलेला हात आणि ती प्रेमकथा शेवटपर्यंत घेऊन जातांना चित्रपटाच्या कथेने घेतलेले आढेवेढे काहीसे अनाकलनीयच होते. काही बाबी मनातून पटल्या, काही भन्नाट वाटल्या, काही ठीकठाक वाटल्या तर काहींबाबतीत असेही वाटले, कि "याची काय गरज होती इथे?"

     चित्रपटात दाखवलेली मैत्री तेवढी मनाचा ठाव घेणारी ठरली. लहान वयातच मुलांमध्ये समाजाकडून कसे विचार पेरल्या जातात आणि आपसूकच; तेच मुलं आपापसांत भांडणं वगैेरे करून नंतर आत्मपरीक्षणाद्वारे 'वेळोवेळी' सामाजिक एकी प्रस्थापित करण्याची तयारी दाखवतात, हा घटनाक्रम अगदी हसत खेळत मांडलेला असल्यामुळे एकूणच पाहण्यात काहीशी मजा आली.

     दामले (Upper Caste) आणि बेंडे (Lower Caste) यांची जुळवणी व्हावी; याकरिता केलेला खटाटोप पाहायला तसा बरा वाटला; पण जरा जास्तच लांबवल्यासारखाही वाटला. वयाच्या चार अवस्था बदलल्यानंतर तीच वेळ आणि तेच प्रसंग काहीसे रेंगाळल्यासारखे वाटत होते. शिवाय मुख्य पात्राच्या ज्या प्रेयसीने सुरुवातीला त्याचा हात धरलेला आणि तिच्यामुळेच हा एकूण घाट घातलेला; मुळात तिचा संवाद फक्त दोन ते तीन वाक्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमकथेबाबत असलेली रुची मध्यांतरपर्यंतच कमी कमी होत जात संपुष्टात येते. 

     मध्यांतरपर्यंत चित्रपट ठीकठाक आहे. काही प्रबोधनात्मक बाबी आहेत, काही गंमतीजंमती आहेत तर काही विचार करण्यालायक गोष्टी देखील आहेत; असे म्हणायला हरकत नाही. पण मध्यांतरनंतरचा चित्रपट बळजबरी लांबवल्यासारखा वाटत जातो. काही दृश्य तर अगदी संबंधबाह्य वाटतात. कॉलेजात गेलेला बेंडेंचा आशिष, शाळेतली त्याची असलेली प्रेयसी; अर्थातच दामल्यांची सृष्टी आणि या दोघांमध्ये दरी निर्माण करणारा चितळ्यांचा यश हे कॉलेजात आल्यावर अचानकपणे बदलून जातात. काही ठराविक पार्श्वभूमी नसतांना सृष्टी आशिषला भेटायला बोलवते. त्यासाठी त्याला चष्म्यापासून ते पेट्रोलपर्यंत त्याचे मित्र सुविधा पुरवतात आणि आशिष सृष्टीला भेटायला जातो. त्यादरम्यान दर्शकांना संभ्रमित करणारा ट्रक अपघाताचा सीन पाहून वाटलं; "याची काही गरज नव्हती."

     दोघांची कॉलेजात भेट होते आणि हातात हात येतात; तितक्यात दोघांच्याही पालकांचा प्रवेश होतो आणि दोघांचेही पालक अवघ्या अर्ध्या मिनिटांत लग्नाला मान्यता देऊन टाकतात. तेव्हा मात्र सत्य परिस्थिती आणि चित्रपट यांच्यात समतोल साधणारी दुवा ताडकन् तुटून पडते. म्हणजे काहीही राव! एवढ्या लवकर कुणाचे आई वडील तयार होतात? तेही मुलगी ब्राह्मण आणि मुलगा महार असतांना! हा प्रसंग खरंच डोक्याच्या बाहेरचा होता.

     या तथाकथित आंतरजातीय विवाहाचे पडसाद जागतिक पातळीवर पडतात आणि आपल्या देशाच्या शत्रू देशांमध्ये फूट पाडण्याची भावना निर्माण होऊन ते एकत्र येतात आणि भारतावर हल्ला करतात. त्यातही देशातील एकजुटीमुळे त्यांचा मानसिक पराभव होतो. इथपर्यंत ठीक होतं, पण शेवटी विवाहित आशिष आणि सृष्टीसोबत चहा प्यायला एलियन आलेले दाखविण्यात आले आहेत. चक्क ए लि य न! हा प्रसंग पाहतांना अक्षरश: डोक्याला हात लावलेला आणि पुन्हा तोंडातून तेच वाक्य बाहेर पडलं, "याची काय गरज होती?"

     एकंदरित आंतरजातीय विवाहाचे अंतराळ पातळीवर किती सकारात्मक पडसाद पडतात; हे दाखविण्यासाठी मध्यांतरनंतर बळजबरी ताणलेली पटकथा, सद्यस्थितीतील वास्तविकतेला जुळवून पहाल तर निराश व्हाल. केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून पाहू शकता.

- अविनाश काठवटे





Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)